Friday 14 November 2014

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई 
गंगा... आपल्यासाठी ही केवळ एक नदी नाही... तर गंगा ही आपली सभ्यता आहे, संस्कृती आहे... गंगा आणि आपल्या संस्काराचं अतूट नातं जोडलं गेलंय. इतकंच नाही तर गंगेशी आपला स्वाभिमानही जोडला गेलाय. देशात गंगेला आईप्रमाणे पूजलं जातं... आणि गंगाजल म्हणजे अमृतच... जन्मापासून मृत्यूपर्यंत गंगाजल प्रत्येक भारतीयाशी जोडलं गेलंय.
आपल्या संस्कृतीत गंगाजलाशिवाय जन्मापासून ते मोक्ष मिळेपर्यंत सगळ्याच गोष्टी अपूर्ण ठरतात. म्हणूनच प्रत्येक घराला गंगाजलाचा वारसा लाभलेला दिसतो. परंतु, आपल्या स्वत:च्याच बेजबाबदारपणामुळे हेच शुद्ध, स्वच्छ, निर्मळ गंगाजल विषा बनतंय. औद्योगिक प्रदूषण आणि शहरांची घाण यांमुळे गंगाजलाचं अस्तित्वच धोक्यात आलंय.
1985 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी गंगेच्या साफसफाईसाठी ‘गंगा अॅक्शन प्लान’ बनवला होता. 29 वर्षांत जवळपास 40 हजार करोडोंपेक्षा जास्त पैसे खर्च केल्यानंतरही गंगेच्या परिस्थितीत सुधारणा झाल्याचं काही दिसून येत नाही. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, हीच परिस्थिती कायम राहिल्यास पुढच्या 30 वर्षांत गंगा आणि गंगाजल दोघांचंही अस्तित्व कायमचं संपुष्टात येईल. गंगेचं अस्तित्व संपण्याचा अर्थ आहे आपली संस्कृतीच नष्ट होणं... आपले संस्कार नष्ट होणं... असं होऊ नये, असं तुम्हालाही नक्कीच वाटत असणार...
गंगा वाचविण्यासाठी देशातलं सगळ्यात मोठं नेटवर्क ‘झी मीडिया’नं सगळ्यात मोठी मोहीम सुरु केलीय. या मोहिमेचं नाव आहे ‘गंगाजल... माय प्राईड’. आम्ही गंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत गंगेचा एक एक थेंब वाचवण्यासाठी आंदोलन सुरू करत आहोत. या मोहिमेत तुम्हीही सोबत असाल तर आम्हाला 09540285000 वर मिस्ड कॉल द्या. किंवा तुमचं म्हणणं देण्यासाठी gangajal@zeenetwork.com या ई-मेल आयडीवर मेल पाठवा तसंच गंगेसोबत तुमचा फोटोही तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता.


First Published: Tuesday, May 20, 2014 - 16:23

No comments:

Post a Comment