ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे उपजिल्ह्याचा दर्जा असलेलं पालघर आता स्वतंत्र जिल्हा म्हणून ओळखलं जाईल. पालघर जिल्ह्यात ठाण्यातील वसई, पालघर, डहाणू, विक्रमगड, तलासरी, जव्हार, मोखाडा आणि वाडा अशा आठ तालुक्यांचा समावेश असेल. आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे ग्रामीण जिल्ह्याचे अध्यक्ष आनंद ठाकूर यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय.
पालघर जिल्ह्यात प्रामुख्यानं आदिवासी लोकसंख्या जास्त आहे. या विभाजनामुळे आदिवासी भागाचे प्रश्न सोडवणं सोपं आणि वेगवान होणार आहे . राज्य सरकारनं आदिवासींसाठी (Adivasi) मोठ्या प्रमाणात विविध योजना आणल्या आहेत. पण ठाणे जिल्ह्याच्या वाढत्या नागरिकीकरणामुळं प्रशासनावर खूप ताण पडतो आहे आणि त्यामुळेच शासनाला आदिवासींसाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करता येत नसल्याचं आनंद ठाकूर यांनी सांगितलं.
'पालघरचं उपजिल्ह्यातून जिल्ह्यात रूपांतर झाल्यामुळे आदिवासी भागाला प्राधान्य मिळेल. बँकाचं विभाजन, मुख्यालय कुठं असणार ?, शासकीय कार्यालयाचं विभाजन कसं करणार याचा वाद आताच करणं योग्य नाही. आधी अनेक वर्षांपासून रखडेलं विभाजन होऊ द्या, मग प्रशासकीय यंत्रणेची उभारणी करू. पालघरमध्ये शासनाची शेकडो एकर जमीन आहे. तिथे शासकीय यंत्रणा उभी करता येऊ शकते. शासनानं ठरवल्याप्रमाणे १५ ऑगस्ट २०१४ आधी विभाजनाची प्रक्रिया पूर्ण करावी, आमच्या ग्रामीण विभागासाठी हीच आनंदाची बाब असेल', अशी प्रतिक्रिया ठाकूर यांनी दिली.
No comments:
Post a Comment